सार्वजनिक आरोग्य

'मानोसोपचार तज्ञ नसेल तेथे'

मानसिक आरोग्यावरील मार्गदर्शक पुस्तक - विक्रम पटेल

विक्रम पटेल लिखित ‘Where there is no Psychiatrist’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘मानोसोपचार तज्ञ नसेल तेथे’ हे पुस्तक! 

हे पुस्तक कशासाठी? कुणासाठी?

विशेषतः विकसनशील देशांतील स्थानिक पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा देणारे आरोग्य सेवक, परिचारिका, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना डोळ्यांसमोर ठेवून लोकांच्या मानसिक आरोग्याची दखल घेण्याच्या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आले. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, स्वयंसेवी संस्थांना खरोखरच हे पुस्तक मार्गदर्शक ठरावे, आरोग्यसेवकांना मानसिक आजारांवर उपचार करताना आत्मविश्वास मिळावा हे या पुस्तकाच्या निर्मितीमागील मुख्य हेतू आहेत. अलीकडच्या काळात मानसिक आरोग्याची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली स्थिती लक्षात घेता ‘मानोसोपचार तज्ञ नसेल तेथे’ पुस्तकापर्यंतची महाराष्ट्रीयन लोकांची पोहचही वाढलेली दिसते.

काय काय आहे या मागर्दर्शक पुस्तकात? 

यामध्ये मानसिक आजारांची प्राथमिक स्वरुपाची माहिती दिल्यानंतर संबंधित ३० वैद्यकीय समस्यांची सोपी वर्णने आणि स्पष्टीकरणं दिली आहेत. १५० पेक्षा अधिक चित्रं आणि केस स्टडीजचा समावेश या पुस्तकात आहेत. नेहमीच्या वैद्यकीय समस्यांसाठी पटकन वापरता येतील असे फ्लोचार्टस आहेत.

आजाराचे निदान आणि व्यवस्थापनासाठी ‘समस्या सोडविण्या’च्या पद्धती, मानसिक आरोग्य समस्यांवरील साध्या उपचार पद्धती मांडल्या आहेत. विशिष्ट परिस्थितीत आजार कसे उद्भवतात याबाबतचे तपशील आणि यासोबतच मानसिक आरोग्याचे संवर्धन करणाऱ्या उपक्रमांच्या संदर्भात प्रश्नांची सविस्तर चर्चा पुस्तकात केली आहे. औषधांच्या वापरासाठी उपयोगी मार्गदर्शन केले आहे. स्वयंसेवी संस्थांची माहिती, औषधांची नावे, किंमती याचाही पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात अंतर्भाव आहे.

पुस्तक कसे वापरावे?

या पुस्तकात एकूण चार भाग आहेत. इतर भाग वाचण्याआधी भाग १ समजून घेणे महत्वाचे आहे. कारण या भागात मुलभूत संकल्पना मांडलेल्या आहेत. वैद्यकीय लक्षणे हाताळण्यासाठी परिशिष्टांमध्ये दिलेल्या तक्त्यांचा वापर ‘पटकन बघायचे संदर्भ’ म्हणून वापरता येईल. प्रत्यक्ष कृतीसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त व्हावे यासाठी विक्रम पटेल यांची आरोग्य विषयक इतरही पुस्तके जरुर वाचावीत.

पुस्तक कुठे मिळेल?

मूळ प्रकाशकांच्या आग्रहानुसार ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर कालनिर्णय प्रकाशनाने हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध केले. कालनिर्णयची प्रकाशनं मिळणाऱ्या स्टॉल्सवर हे पुस्तकही उपलब्ध असेल.

या पुस्तकाचा अनुवाद, प्रकाशन, निर्मिती आणि प्रसार या संपूर्ण प्रवासात तथापि ट्रस्टच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे. 

मूल्य: २५० रु.

 

आपलं पाणी दिनदर्शिका

पाणी हा सर्वांच्या जवळचा आणि मुलभूत विषय. पाण्याचा तुटवडा पडला, की हा पाणीप्रश्न ऐरणीवर येतो. माणसांना, प्राण्यांना दुष्काळाच्या झळा बसायला लागतात.. कोरडा नाहीतर ओला दुष्काळ, ही परिस्थिती महाराष्ट्रातील अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये सातत्याने उद्भवत असते.

या धर्तीवर, अस्तित्व समाज विकास व संशोधन संस्था, सोलापूर आणि ग्रामीण महिला विकास संस्था, लातूर या संस्थांनी या जिल्ह्यांतील ३० गावांमध्ये ‘दुष्काळ, स्त्रिया आणि आरोग्य’ हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाद्वारे प्रामुख्याने स्त्रिया, युवक आणि युवतींसोबत काम करताना लोकसहभागाचे उद्दिष्ट बाळगून अनेक उपक्रमांमध्ये गावकरी, लहान मुलं, ग्रामपंचायत यांचा सहभाग घेऊन कार्याची दिशा धरली. दुष्काळाचा सामना करण्याबरोबरच पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर, साठवण कशी करता येईल, त्यासाठी कशा प्रकारे लोकसहभाग द्यावा याबाबतचे मार्गदर्शनही प्रकल्पक्षेत्रात केले गेले. ज्यामध्ये विहीर पुनर्भरण, पाण्याचे हौद बांधणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, सांडपाण्याचे नियोजन आणि कचऱ्याचे व्यवस्थापन, खताचे खड्डे घेऊन खत तयार करणे, परसबाग करणे, चारा उत्पादन, योग्य पीकलागवड पद्धती, वृक्षलागवड अशा अनेक मुद्यांचा विचार करुन विविध उपक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला होता. अर्थातच सहभागातून, प्रशिक्षणातून अनुभवांची देवाण-घेवाण, गटबांधणी यातूनच परिवर्तनाची दिशा निश्चित होऊन सक्रीय कार्याला आणि गावाच्या शाश्वत विकासाला बळकटी येते, हे प्रत्यक्ष कामातून, प्रयोगातून दर्शवून योग्य दिशेने वाटचाल करण्यास मार्गदर्शक ठरणारा हा मुलभूत प्रकल्प घडला.

सदर दिनदर्शिका ही या प्रकल्पावर आधारलेली आहे. संबंधित विविध मुद्यांवर दिनदर्शिकेच्या माध्यमातून मांडणी करण्यात आली आहे. याचे लेखन, संपादन तथापि ट्रस्टने केले असून या प्रकल्पात तथापिचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे. संदर्भासाठी ही दिनदर्शिका इथे देत असून यातील माहिती आजही उपयुक्त आहे.

ही दिनदर्शिका सन २०१५ मध्ये प्रकाशित केली आहे.