अपंगत्व आणि लैंगिकता

शरीर साक्षरता म्हणजे शरीराशी मैत्री करण्याच्या प्रक्रियेतील पाया असतो आणि हाच तथापिच्या कामाचा गाभा आहे. यातूनच ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयातील कामाचा एक वेगळा प्रवास झाला. लैंगिकता हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, मात्र समाजाचा अपंगत्वाविषयी सहानुभूती किंवा हीनता दर्शवणारा दृष्टीकोन अपंगांचे मुलभूत हक्क डावलत असतो. यामध्ये अपंग मुला-मुलींच्या किशोरवयीन बदलांचा, लैंगिक भावनांचा, गरजांचा, जोडीदार निवडीचा तुलनेने विचार केला जात नाही किंवा दुर्लक्ष करण्याकडे अधिक कल दिसतो.

म्हणूनच अपंगत्वासह त्यांच्या लैंगिक गरजा समजून घेणं, त्यासाठीच्या सकारात्मक पद्धती शोधणं किंवा विकसित करणं, पूरक आणि सकारात्मक दृष्टीकोन मांडण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करणं या धर्तीवर मागील सात-आठ वर्षांपासून तथापि संवाद साधत आहे. या प्रक्रियेतून पुढील काही उपयुक्त संसाधनं विकसित झाली आहेत.

गोष्ट शरीराची... मनाची... (अंध मुला-मुलींसाठी संच)

काय आहे गोष्ट शरीराची... मनाची..?

इतर मुलांसारखंच अंध मुलं-मुली पण वयात येत असतात. दृष्टी नसणं किंवा कमी असणं यामुळे किशोरावस्थेतील नैसर्गिकता, लैंगिकता, भाव-भावना कमी ठरत नसतात. त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे मिळणं आणि सकारात्मक दृष्टीकोन पोहचवणं ही त्यांचीही गरज आणि हक्क आहे. या विचारांतून ‘गोष्ट शरीराची... मनाची..’ हा अंध मुला-मुलींसाठीचा शरीर साक्षरता संच आकाराला आला. ज्यामध्ये उत्क्रांती, माणसाचा जन्म, आपलं शरीर, आपल्या भाव-भावना, आपल्या स्व प्रतिमा, आपले आरोग्य, साधे आजार आणि त्यावरचे साधे सोपे उपाय, वयात येताना होणारे बदल, प्रेम आणि लैंगिकता, लैंगिक आरोग्य, लैंगिक छळ आणि सुरक्षितता अशा अनेक सत्रांचा समावेश आहे. कविता, गोष्टी, प्रश्नोत्तरे अशा विविध स्वरुपामधून ही सत्रं अतिशय संवादी झाली आहेत.

काय काय आहे या संचामध्ये? आणि कुणासाठी आहे हा संच?

अर्थातच हा संच प्रामुख्याने अंध मुला-मुलींसाठी आहे. गोष्ट शरीराची... मनाची.. हे ब्रेल लिपीतील पुस्तक आहे. जोडीला ऑडीओ डीव्हीडी आहे. सर्वांनाच ब्रेल वाचता येत असेल असं नाही, पण अनेकांना ऐकून सत्रं समजण्यास सोपी असतील, हे लक्षात घेऊन वरील सत्रं अधिक संवादी पद्धतीने ऑडीओ स्वरुपात तयार करण्यात आली आहेत. तसेच पालक व शिक्षकांना मुला-मुलींबरोबर सत्रांविषयी संवाद साधता यावा, या उद्देशाने या संचात पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शिका आहे.

हा संच विक्रीसाठी उपलब्ध आहे. हवे असल्यास संपर्क : tathapi@gmail.com

देणगीमूल्य: ३०० रुपये

 

शरीर साक्षरता सर्वांसाठी

Goshta-Shareerachi-Manachi

मतिमंद मुला-मुलींचं वयात येणं, लैंगिकता याबाबतीतील त्यांचे अनुभव, विचार, समज-गैरसमज, विविध भावना हाताळण्याच्या पद्धती, वेगवेगळे दृष्टीकोन; या साऱ्या गोष्टींचा वेध घेण्यासाठी तथापिने सुरुवातीला महाराष्ट्रातील विविध भागांत अपंग मुलांचे पालक, शिक्षक, निवासी संस्थांमधील काळजी घेणारे कार्यकर्ते, समुपदेशक यांच्याबरोबर गटचर्चा घेतल्या. या संवादाचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक!

काय आहे हे पुस्तक?

मतिमंद मुला-मुलींचं वयात येणं, लैंगिकता, त्यांच्या लैंगिक अभिव्यक्तींबद्दलचे पालक, शिक्षक, समुपदेशक आणि कार्यकर्ते यांच्या अनुभवांचे संकलन.

मतिमंदत्वाच्या क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ व्यक्तींचे लेख, एका आईची मुलाखत, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे, एका शाळेने फार पूर्वीपासून राबवलेला एक अभ्यासक्रम, एका आधार गटाची गोष्ट अशा सहजसोप्या माध्यमांची वैविध्यता.

समलिंगी संबंध, हस्तमैथुन, लग्न, लैंगिक शोषण आणि सुरक्षितता, अशा संवेदनशील मुद्द्यांचा समावेश.

मतिमंद मुलांचे मुला-मुलींचं वयात येणं, लैंगिकता हे इतरांप्रमाणेच नैसर्गिक असून समाजामध्ये याविषयीचा शास्त्रीय आणि सकारात्मक दृष्टीकोन रुजवण्यासाठी, त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी मदतपूर्ण.

यासोबतच बाळाच्या विकासाचे टप्पे, मतिमंदत्वाची कारणे आणि प्रकार, आपल्या शरीराची थोडक्यात माहिती, शरीराच्या अंतर्गत अवयवांची काळजी कशी घेता येईल अशा महत्वपूर्ण विषयांचा क्रमवार समावेश पुस्तकाच्या मुख्य विषयाची वाटचाल हळूवार आणि अर्थपूर्ण करतो.

‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’च पण हे पुस्तक नेमकं कुणासाठी?

मतिमंद मुला-मुलींच्या पालक आणि शिक्षकांसाठी, शाळांमधील, निवासी संस्थांमधील काळजी घेणारे कार्यकर्ते, तसेच मतिमंद मुला-मुलींशी संवाद साधणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे!

हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. हवे असल्यास संपर्क : tathapi@gmail.com

देणगीमूल्य: २०० रुपये

 

मतिमंदत्व आणि लैंगिकता - पोस्टर संच

काय आहे हा पोस्टर संच?

अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती आणि लैंगिकतेच्या मुद्द्यांसंबंधी हक्काधारित भूमिका स्पष्ट करणारी ही चार पोस्टर्स आहेत. या विषयासंबंधी समाजाच्या धारणा आणि, गैरसमज, लैंगिक शिक्षणाची योग्य व्याख्या पोस्टरमध्ये दिल्या आहेत. तसंच तरुण व प्रौढ मतिमंद व्यक्तींसाठी लैंगिक शिक्षण का गरजेचं आहे हेही यामध्ये सविस्तर सांगितलं आहे.

कुणासाठी आहे हा संच?

अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसोबत काम करणारे कार्यकर्ते, संस्थाचालक, शिक्षक, पालक या सर्वांसाठी ही पोस्टर उपयोगी आहेत. तसंच लैंगिकतेच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्यांसाठी अपंगत्वाचा पैलू समजून घेण्यासाठी देखील हा संच उपयोगी पडेल.